ट्रेलर, ट्रकच्या रांगा

प्रवाशांसह नागरिकांचा जीव धोक्यात

| रसायनी | प्रतिनिधी |

पळस्पेफाटा ते शिरढोण गाव मार्गावरील कंटेनर फ्रेट स्टेशन आणि लॉजिस्टिक यार्डमुळे होणाऱ्या बेकायदेशीर वाहतूक कोंडीमुळे हजारो प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. दळणवळण, वाहतूक व व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.लॉजिस्टिक यार्डमध्ये जाणाऱ्या शेकडो ट्रेलर, ट्रकांनी मुख्य रस्त्यापासून थेट उड्डाण पुलावर धोकादायक पद्धतीने पार्किंग केल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार लॉजिस्टिक यार्डमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शंनाखाली खालापूर तालुका सदस्य साबीर शेख यांनी स्वतः दखल घेत लॉजिस्टिक पार्क विभागाशी संपर्क साधला. संबंधित ठिकाणी ट्रेलर चालकांना सूचना देत वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने वाहतूक पोलीस व संबंधित नियंत्रण विभागास ही माहिती देण्यात आली. या प्रकारावर तातडीने अंकुश आणण्यासाठी व उपयोजना होण्यासाठी सूचना केल्या.

वाहतूक पोलीस व नियंत्रण विभागाने लॉजिस्टिक यार्डची पार्किंग क्षमता व नियमांची काटेकोर तपासणी करावी, वर्क ऑर्डर किंवा व्यावसायिक परवाने देताना कठोर अटी व शर्ती लागू कराव्यात, यार्डमध्ये पार्किंग, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्यास संबंधित उद्योग परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत, अशी ठोस मागणीवजा सूचनाही करण्यात आली आहे. यार्ड व्यवस्थापनाने या घटनेची तातडीने दखल घेतल्याचे दिसून आले असले, तरी भविष्यात उड्डाण पुलावर ओव्हरलोड व बेकायदेशीर ट्रक पार्किंगमुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणत्या ठोस उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version