प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी
। उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील अनधिकृत कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत पत्रकार व सामाजिक संघटनांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. आज या वाहतूक कोंडीचा फटका अॅम्ब्युलन्सला बसला आहे. मात्र, स्थानिक जनतेच्या जागरुकतेमुळे रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. याला वेळीच आला घातला नाहीतर या ट्रेलरचालकांना वठणीवर आणण्यासाठी जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.
उरण तालुक्याचे ओद्योगिकीकरण वाढले असल्याने आयात-निर्यात वाढली आहे. त्यामुळे या भागात कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. त्यातील बहुतांश कंटेनर यार्ड हे सिडकोच्या जागेवर अनधिकृतपणे उभारले आहेत. या यार्डमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी अवजड वाहने ट्रेलर ये-जा करीत असतात. ट्रेलर चालक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून ते भर रस्त्यात कोठेही उभे करीत असतात. तसेच सर्व्हिस रोड हा छोट्या वाहनांसाठी असतानाही त्या रस्त्यावरही ट्रेलर चालकांनी कब्जा करून ट्रेलर उभे केले असल्याचे चित्र उरण-पनवेल, उलवा, दिघोडे, गव्हाण फाटा आदी ठिकाणी असे चित्र खुलेआम दिसत आहे. यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण ही वाढत बळीचा आकडा ही वाढत चालला आहे. त्यामध्ये तरुण वर्गाचा समावेश जास्त आहे.
दरम्यान, अनधिकृत कंटेनर यार्डमुळे भररस्त्यात दिघोडे गव्हाणफाटा भररस्त्यावर उभ्या राहणार्या ट्रेलरमुळे वाहतूक कोंडी होत आहे. आज याचा प्रत्यय येऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी या वाहतूक कोंडीचा फटका रूग्णाला पुढील उपचारासाठी अॅम्ब्युलन्सने घेऊन जात असताना तिलाही बसला. यावेळी स्थानिक जनतेने पुढाकार घेत अॅम्ब्युलन्सला वाट करून दिल्याने रुग्ण वेळीच दवाखान्यात पोहोचल्याने पुढील अनर्थ ठरला आहे. तरी प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन यातून जनतेची सुटका केली नाही, तर त्यांना जनता रस्त्यावर उतरून वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार येथील जनतेने केला आहे.