उरण: खोपटा पुलावर ट्रेलरला अपघात; मालवाहू कंटेनर पलटी

। उरण । वार्ताहर
उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरू झाली आहे. खोपटा पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरला खोपटा गावाजवळील रस्त्यावर अपघात झाला असून सदर ट्रेलर वरील मालवाहू कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला आहे. या अपघातात मोटारसायकल स्वार, टँक्सी चालक थोडक्यात बचावले आहेत.

उरण तालुक्यातील रस्त्यावर ये- जा करणाऱ्या अवजड वाहनांना आर.टी.ओ.व वाहतूक पोलीस यंत्रणेचा धाक नसल्याने, सदर अवजड वाहनांचे चालक हे तालुक्यातील रस्त्यावर बेधडकपणे आपली वाहने चालवताना दिसत आहेत. त्यामुळे अशा बेधडक, बेधुंद वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने सर्रास रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या अपघातात निष्पाप लोकांना नाहक आपले प्राण गमवावे लागत आहे. चिर्ले अपघाताचा दोन दिवसाचा कालावधी लोटत नाही तोच पुन्हा आज खोपटा पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरला खोपटा गावाजवळील रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ट्रेलर वरील मालवाहू कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

मालवाहू कंटेनर रस्त्यावर पडला असता तर मोठा अपघात झाला असता, परंतु सुदैवाने सदर अपघातात रस्त्यावरुन प्रवास करणारे मोटारसायकल स्वार, टँक्सी चालक हे थोडक्यात बचावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.तरी आर.टी.ओ.आणि वाहतूक पोलीस यंत्रणेने उरणकराच्या जीवाशी खेळत असलेल्या अशा बेशिस्त अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version