| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे महामार्गावर सातत्याने अपघातांची सुरू असलेली मालिका थांबण्याचं नावच घेत नाही. दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी (दि.१३) सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रेलरचा ड्रायव्हर मयत झाला आहे.

खोपोली पोलिस घटनास्थळी हजर झाले असून दोन्ही वाहने बाजूला काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरू केले आहेत. यासाठी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा बोरघाट पोलिस महाराष्ट्र सुरक्षा बल आणि स्थानिक क्रेन ऑपरेटर यांनी मदत केली आहे.
एक्सप्रेस वे वरून प्रवास करणारी वाहने ट्रॅफिक जॅमची शंका आल्याने जुन्या मार्गावर वळली आहेत. त्यामुळे खंडाळ्याकडे जाणारी वाहतूकसुद्धा बाधित झाली आहे.
सदर अपघातात ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज वर्तवला जात असून अपघातादरम्यान ट्रेलरने जवळपास 100 मीटर रेलींगचा आर सी सी चा भाग ठिकठिकाणी तोडला आहे. ट्रेलर जेव्हा उलटला त्याच्या आजूबाजूला कोणतेही वाहन नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली. मात्र अजून एक वाहन त्याठिकाणी बाधित झाले. त्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही.
सकाळची वेळ असल्यामुळे वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पुणेकडील जाणारी लेन बेशिस्त वाहन चालकांमुळे जॅम झाली आहे. काही वेळातच सर्व वाहतूक सुरळीत होईल.
मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने झालेल्या ट्रेलरच्या या अपघातात एकूण २ वाहने अपघातग्रस्त झाली आहेत. ट्रेलरला अपघाताच्या ठिकाणाहून बाजूला काढून अंडा पॉईंटजवळ सुरक्षित जागी हलविले असून दुसरे वाहनदेखील सुरक्षित जागी ठेवले जाणार आहे.