कोलाड उड्डाण पुलावर ट्रेलर पलटी

संरक्षण कठडे नसल्याने अपघात, मोठा अनर्थ टळला

। कोलाड । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कोलाड येथील उड्डाण पुलावर संरक्षण कठडे नसल्याने कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाल्याची घटना रविवारी (दि. 9) पहाटे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागोठणे बाजूकडून माणगावच्या दिशेने कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोलाड उड्डाण पुलावरून जात होता. पुलावरील संरक्षण कठडे अपूर्ण असल्याने चालकाला पुलाचा योग्य अंदाज न आल्याने ट्रेलरचा तोल गेला आणि वाहन पलटी झाले.
अपघातादरम्यान ट्रेलरचा जॉईंट तुटल्याने कॅबिन पुलावर राहिली, तर ट्रेलरचा मागील भाग बायपास रस्त्यावर पलटी झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मात्र, चालकासह अन्य कोणालाही दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणाचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 16 ते 17 वर्षे सुरू असून, अद्यापही अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. काही ठिकाणी उड्डाण पुलांची कामे रखडलेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कोलाड येथील उड्डाण पुलालाही संरक्षण कठडे पूर्णपणे बसविण्यात आलेले नसतानाच दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version