| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या आगामी जनगणना 2027 या राष्ट्रीय उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तहसील कार्यालयामार्फत व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक, तहसीलदार पनवेल मीनल भोसले, भामरे तसेच अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना 2027 साठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू असून, सुमारे 1800 प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पार पाडण्यात येत आहे.
या अनुषंगाने प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण 23 एप्रिल 2026 ते 8 मे 2026 या कालावधीत सिकेटी ज्युनिअर कॉलेज, नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. पनवेल शहराची सुमारे 7 लाख 29 हजार इतकी मोठी लोकसंख्या लक्षात घेता, जनगणनेचे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध शाळांतील शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दोन दिवसांत जनगणनेची सैद्धांतिक माहिती देण्यात येते, तर तिसऱ्या दिवशी क्षेत्रीय प्रशिक्षण दिले जाते. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना बाबत जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घरगुती गणना हा जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. पनवेल तहसील कार्यालयामार्फत या राष्ट्रीय कर्तव्यासाठी योग्य नियोजन, समन्वय व प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत असून, संपूर्ण यंत्रणा तत्परतेने कार्यरत आहे.







