मुंबईकर तरुणांची ट्रान्स सह्याद्री मोहीम फत्ते

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पायी प्रवास

| रायगड | प्रतिनिधी |

मुंबईतील सुदेश परब आणि ज्ञानेश्वर नाईक या दोन तरुणांनी सह्याद्रीच्या अखंड घाटमाथ्यावरून पायी प्रवास करीत ट्रान्स सह्याद्री मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेवर असलेल्या 21 किल्ल्यांची चढाई करत त्यांनी तापी ते तिलारी ही सह्याद्री मोहीम फत्ते केली. त्यात त्यांनी केवळ 25 दिवसांच्या कालावधीत 1279.3 किलोमीटरचा डोंगरवाटांचा प्रवास, 36 हजार 24 मीटर उंचीची चढण व तितकीच उतरण असा रोजचा सरासरी 51.17 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केला.

मुंबईतील सुदेश परब आणि ज्ञानेश्वर नाईक या कोकणातील तरुण गिर्यारोहकांनी तापी ते तिलारी ही ट्रान्स सह्याद्री मोहीम पूर्ण केली. गुजरात सीमेवर नंदुरबार जवळील प्रकाशा येथे तापी नदीजवळून सुरू झालेल्या प्रवासाची कोकणातील पारगड किल्ला सर करून पुढे गोवा सीमेवरील दोडामार्ग येथील तिलारी नदीजवळ सांगता झाली. या प्रवासात दोघांनी 1279.3 किलोमीटरचे अंतर 25 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केले. विशेष म्हणजे, या प्रवासात कोणतेही वाहन, होडी तसेच रेल्वेस्थानकातील एस्केलेटरचा देखील त्यांनी वापर केला नाही. या मोहिमेत डोंगरवाटा, जुने जंगलातील मार्ग, पायवाटा, कच्च्या व पक्क्या रस्त्यांची त्यांनी निवड केली.

सुदेश परब व ज्ञानेश्वर नाईक यांनी बोलताना सांगितले की, ट्रान्स सह्याद्री मोहिमेअंतर्गत सह्याद्रीच्या अखंड घाटमाथ्यावरून पायी चालून आम्ही सुमारे 1200 किलोमीटरहून अधिक अंतर पार केले. मागील 2 वर्षांपासून आम्ही या मोहिमेकरिता सराव केला. हजारो किलोमीटरची पायी रेकी व त्या दरम्यान परिसराचा अभ्यासही केला होता. त्यात गड आणि वाटांची माहिती घेणे, गावकऱ्यांशी संवाद साधून पायवाटा जाणून घेण्यापासून या मार्गावरील दुकाने, हॉटेल यांची नोंद ठेवत होतो. मागील अनेक वर्ष गड किल्ल्यांची भ्रमंती करणे, घाटवाटा आणि गडांची सांगड घालून लहान-मोठ्या मोहिमा आखणे, हे सर्व करण्याबरोबरच आम्ही स्वतःची शारीरिक तयारीही केली होती. परिणामी, कोणताही त्रास न होता यशस्वीरीत्या पायी चालून 30 दिवसांची नियोजित मोहीम आम्ही 25 दिवसांत पूर्ण करू शकलो, हे याचे फलित म्हणावे लागेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

21 गड किल्ल्यांचा समावेश
या मोहिमेत रायकोट, सालोटा, साल्हेर, हातगड, भास्करगड, त्रिंगलवाडी, कुलंगगड, रतनगड, हरिश्चंद्रगड, जीवधन, दुर्ग-ढाकोबा, घनगड, कोकणदिवा, रायगड, मोहनगड, दातेगड, विशाळगड, मुडागड, नारायणगड, महादेवगड आणि पारगड या 21 गडांचा समावेश आहे. यासह अंधारबन, कोयना, सह्याद्री टायगर रिझर्व्ह (बफर झोन), आंबा घाट, बरकी सडा, मुडागड परिसर, मनबेट अशा घनदाट जंगलांतूनही प्रवास केला.

ट्रान्स सह्याद्री मोहिमेत आम्ही डोंगरमाथ्यांवरून प्रवास केला. त्यामध्ये घाटवाटा, जंगलाचा मार्ग, गावांतील पायवाटांना प्राधान्य दिले. काही भागांमध्ये भर उन्हात डांबरी रस्त्यावरून चालताना फारच रटाळ व गर्मीचा त्रास होत असे; परंतु रेकी करताना, लहान मोठ्या मोहिमांदरम्यान शरीराला या सर्वाची सवय केल्यामुळे त्याचा फारसा त्रास झाला नाही. रस्ते पटपट चालत पूर्ण करीत आम्ही पुन्हा घाट किंवा गडांकडे जाणारी वाट निवडून प्रवास करायचो. पहाटे लवकर चालणे सुरू करून सायंकाळपर्यंत आम्ही चालत होतो. दररोज सुमारे 50 ते 60 किलोमीटर अंतर आम्ही पूर्ण करीत होतो. दुपारच्या जेवणामुळे सुस्ती येऊ नये यासाठी जेवणाऐवजी आम्ही सुकामेवा, चिक्कीसारख्या पदार्थांची निवड केली होती.

सुदेश परब,
गिर्यारोहक
Exit mobile version