पथविक्रेत्यांचे व्यवहार होणार कॅशलेस

बँक ऑफ इंडिया व नगरपरिषदेचा पुढाकार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरामधून रोखीत अर्थव्यवहार लवकरच कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अलिबाग नगरपरिषद व बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी क्यू आर कोड वितरीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. गुरुवारी झालेल्या शिबीरात पथविक्रेत्यांना क्यु आर कोड वितरीत करण्यात आले.

यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे , बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी प्रबंधक विजय कुलकर्णी, कर्मचारी व पथविक्रेत, बचत गटातील महिला सदस्य उपस्थित होते.

अलिबाग नगरपरिषदेमार्फत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत करण्यासाठी शिबीराचे आयोजन नगरपरिषदेच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला वृध्दींगत करण्यासाठी कर्जाविषयक मार्गदर्शन विजय कुलकर्णी यांनी केले. पथविक्रेत्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्याचे आवाहनही अनेक बँकाना करण्यात आले. या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात दहा, दुसऱ्या टप्प्यात 20 आणि तिसऱ्या टप्प्यात 50 हजार रुपयांचे कर्ज वितरीत केले जाणार आहे.यावेळी नवीन कर्जाचे अर्ज भरून घेण्यात आले. बँकाकडे प्रलंबित असलेल्या कर्जांची प्रकरणे निकाली लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आर्थिक व्यवहार ऑनलाईन व्हावे यासाठी अलिबाग नगरपरिषद व बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला. या शिबीराच्या निमित्ताने क्यु आर कोडचा वापर अधिक करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचे महत्व बँकेमार्फत पटवून देण्यात आले. अलिबाग शहरात कॅशलेस व्यवहार ठिकठिकाणी सुरु आहे. आता या व्यवहाराला अधिक गती मिळणार असून पथ विक्रेत्यांचे आर्थिक व्यवहार कॅशलेस होणार आहेत. शहरात काही पथविक्रेत्यांकडून अशा पध्दतीने व्यवहार सुरु आहेत. अन्य पथविक्रेत्यांचे त्याच पध्दतीने व्यवहार व्हावे यासाठी बँकाकडून क्यू आर कोड लवकरच दिले जाणार आहेत.

पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी आर्थिक उभारी मिळावी यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत सुमारे 250 जणांना बँकामार्फत कर्ज वितरीत केले आहे. उर्वरित पथविक्रेत्यांना कर्ज वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच आर्थिक व्यवहार डिजीटल करण्यासाठी क्यू आर कोडचा वापर करण्यावर भर दिला आहे.

अंगाई सांळुखे – मुख्याधिकारी तथा प्रशासक, अलिबाग नगरपरिषद
Exit mobile version