। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील दोन दुकानांमधून एकाच नंबरच्या दोन पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या श्री विरेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये बनावट नोटांचा वापर करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
महाड शहरांतील एका हॉटेल व्यवसाय करणार्या इसमाकडे पाचशे रुपयांची आलेली नोट बनावट असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर या हॉटेल समोर असलेल्या एका पानाच्या दुकानदाराकडे देखिल बनावट नोट आलेली दिसून आली. या दोन दुकानदारांनी नोटेवरील नंबर तपासला असता दोन्ही नोटावरील नंबर सारखे असल्याचे आढळून आले.दोन्ही व्यवसायिकांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा तोटा सहन करावा लागला. आढळून आलेल्या नोटांचा नंबर 080709 असा असून या दोन्ही नोटा यंत्रामध्ये तपासल्या असता त्यामध्ये देखिल नोटा बनावट असल्याचे दिसून आले.
उत्सवामध्ये अज्ञात व्यक्तीने बनावट नोटा किती वितरीत केल्या आहेत, याचा तपास अद्याप लागलेला नसुन वरील नंबरच्या नोटांपासून नागरिकांनी सावध राहावे व आपले अर्थिक व्यवहार कॅशलेस पद्धतीने करावेत.
– किसलय कुमार, शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया