| अलिबाग | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक शाखाकडे मंजूरीकरिता शिफारस केलेल्या एकूण प्रकरणात नामंजूर, प्रलंबित प्रकरणाची एकूण संख्या जिल्ह्यात जास्त असल्याने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक शाखा व्यवस्थापक व अर्जदारांची एकत्रित समन्वय व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी तसेच प्रमुख बँक शाखा व्यवस्थापक व प्रलंबित, कर्ज नामंजूर प्रकरणांचे अर्जदार उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी रायगड जिल्ह्याकरिता सन-2022-23 वर्षाकरिता 800 प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त असून जिल्हा कार्यबल समितीच्या मंजूरीने एकूण 900 पेक्षा जास्त अर्ज बँक शाखांकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आले असून बँकेने या योजनेंतर्गत केवळ 153 अर्ज मंजूर केले आहेत. तसेच बँकेकडे एकूण 469 प्रकरणे मंजूरीकरिता प्रलंबित आहेत, असे यावेळी सांगितले. प्राप्त उद्दिष्ट व बँकेने मंजूर केलेली प्रकरणे तसेच नामंजूर, प्रलंबित प्रकरणांचे असणारे व्यस्त प्रमाण पाहता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र जिल्हाधिकार्यांनी बँक अधिकार्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना गरजू नागरिकांसाठी सकारात्मक काम करण्यास प्रोत्साहित केले.
याच अनुषंगाने उपस्थित बँक ऑफ इंडिया, अलिबाग, बँक ऑफ इंडिया, कडाव, बँक ऑफ इंडिया, म्हसळा, बँक ऑफ इंडिया चोंढी, स्टेट बँक ऑफ इंडिया, वडखळ, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलिबाग, बँक ऑफ महाराष्ट्र, अलिबाग, बँक ऑफ महाराष्ट्र, पेण, बँक ऑफ महाराष्ट्र, खांब, बँक ऑफ महाराष्ट्र, चौक, बँक ऑफ बडोदा, चणेरा, बँक ऑफ बडोदा, अलिबाग बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, पेण, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाड या बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना त्यांच्याकडे असलेल्या नामंजूर, प्रलंबित प्रकरणाबाबत उपस्थित अर्जदारांसोबत आढावा घेण्यात आला.
नामंजूर करण्यात आलेल्या अर्जावर अर्जदाराकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल तसेच बँक शाखांकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांवर एका आठवड्यात कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. अर्जदारांनीही आपल्या प्रकल्पाकरिता आवश्यक तितक्याच प्रकल्प किंमतीच्या कर्जाची मागणी बँकेकडे करावी व बँकेनेही सीबीआयएल कमी असणार्या अर्जदारांना तो सुधारण्याकरिता बँकेनेही अर्जदारांना आवश्यक ते उचित मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी उपस्थित बँक शाखा व्यवस्थापक व अर्जदारांना केले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँकेकडे प्राप्त अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करून रायगड जिल्ह्याला प्राप्त उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजय कुलकर्णी यांनी केले आहे.