| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशजवळ संघर्षाचा भडका उडाला आणि इकडे राजधानी दिल्लीपर्यंत त्याची धग जाणवायला लागली. मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे वादळी पडसाद पाहायला मिळाले. या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस देत चर्चेची मागणी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. दुपारी 12 वाजता लोकसभेत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अखेर यावर अधिकृत निवेदन दिलं. या प्रकरणात एकही जवान शहीद झाला नसल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं, चीनचा प्रयत्न सैनिकांनी हाणून पाडल्याचंही त्यांनी म्हटलं. संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात चर्चा घडवून आणण्यास मात्र नकार देण्यात आला. त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला. सरकार या प्रकरणाची माहिती चार-चार दिवस लपवून का ठेवतं याबद्दलही विरोधकांनी सवाल उपस्थित केला.
अनेक भारतीय जवान जखमी
अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले. 20 जवान शहीद झालेल्या अडीच वर्षांपूर्वीच्या गलवान संघर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकार्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकार्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची 600 चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले.