रायगडातील दीड हजार गुरुजींच्या बदल्या

ऑनलाईन पद्धतीने होणार कार्यवाही

।  अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 1 हजार 639 शिक्षकांच्या बदल्या होणार असून त्याची प्रक्रीया सुरू आहे. 16 ते 30 मेपर्यंत या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन घेण्यात आली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग, पाल्य अशा अनेक प्रकारच्या निकषानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचे काम करण्यात आले आहे. पूर्वी शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेमध्ये समुपदेशनाद्वारे केल्या जात होत्या. परंतू त्यासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ तसेच खर्चामुळे ही प्रक्रिया क्लिष्ट तसेच विलंबाने होत असे. यंदा मात्र, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया  ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकांना वैयक्तिक लॉगिंग सिस्टीम देण्यात आली आहे. घरबसल्या शिक्षकांना बदल्यांचे आदेश  देण्यात आले आहेत.

जिल्हयातील 1 हजार 639 शिक्षकांच्या बदल्या पाच टप्प्यात झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 245, दुसर्‍या टप्प्यात 81, तिसर्‍या टप्प्यात 237, चौथ्या टप्प्यात 1 हजार 44 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून पाचव्या टप्प्यात 33 तर सहाव्या टप्प्यात 395 बदल्या झाल्या आहेत.  या शिक्षकांना 30 मेपर्यंत कार्यमुक्त केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.  

 395 शिक्षकांची सुनावणी न्यायालयात
जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात 395 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु या अवघड क्षेत्रात केलेल्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत काही शिक्षकांनी आक्षेप घेऊन न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या अवघड क्षेत्रातील बदली मान्य नसल्याने मुंबई येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी 7 जूनला होणार आहे. त्यानंतर  या शिक्षकांच्या बदल्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version