| पनवेल | प्रतिनिधी |
राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपआयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मोठे बदल झाले असून, अनेक अनुभवी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, तर काहींना पदोन्नती मिळाली आहे.
नवी मुंबईचे पोलीस सह-आयुक्त संजय येनपुरे यांची मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) या महत्त्वपूर्ण पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबईचेच अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची पदोन्नतीने पोलीस सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या 5 उपायुक्तांच्या बदल्या इतर शहरात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांची पोलीस उपायुक्त-बृहन्मुंबई, परिमंडळ-3 चे उपआयुक्त प्रशांत मोहिते यांची उपआयुक्त-छत्रपती संभाजीनगर शहर, उपआयुक्त (मुख्यालय) संजय पाटील यांची उपआयुक्त-पिंपरी चिंचवड, वाहतूक विभागाचे उपआयुक्त तिरुपती काकडे यांची पोलीस अधीक्षक-महामार्ग सुरक्षा (रायगड) आणि डायल-112च्या पोलीस उपआयुक्त प्रिती टिपरे यांची पोलीस उपआयुक्त म्हणून मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरातील रिक्त होणाऱ्या पोलीस उपआयुक्त पदांवर प्रकटीकरण-1चे पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त योगेश चव्हाण, अन्न-औषधी प्रशासन (मुंबई) चे पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील सहाय्यक विशेष पोलीस महानिरीक्षक विजय खरात यांची बदली करण्यात आली आहे. तर, राज्य महामार्ग सुरक्षा (रायगड) चे पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांची डायल-112 नवी मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली
