जिल्ह्यातील 37 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

आठ पोलीस निरीक्षकांसह 29 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश


। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात आठ पोलीस निरीक्षक व 29 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याबरोबरच वेगवेगळ्या शाखेमध्ये त्यांची बदली केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यात नवे पोलीस अधिकारी कामकाज पाहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यासह वेगवेगळ्या विभागात बदली करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काढले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या 17 सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रशाकीय कारणामुळे अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि प्रशाकिय कारणामुळे आठ पोलीस निरीक्षकांसह मुळ जिल्ह्यात नियुक्त असलेले एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या जागी संजय पाटील, रेवदंडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्या जागी श्रीकांत किरवले, पोयनाड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांच्या जागी अलिबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांची बदली केली आहे. दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद ढेबे यांची बदली जिल्हा विशेष शाखा (निवडणूक कक्ष) येथे करण्यात आली असून ढेबे यांच्या जागी हनुमंत शिंदे यांची बदली दिघी सागरी पोलीस ठाण्यात केली आहे. नागोठणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांची स्थनिक गुन्हे शाखेत तर माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची अलिबाग पोलीस ठाण्यात बदली केली आहे. म्हसळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान सोनवणे यांची बदली जिल्हा वाहतूक शाखेत केली आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांची बदली दहशतवाद विरोधी शाखेत केली असून त्यांच्या जागी सोमनाथ लांडे यांची नियुक्ती केली आहे. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या या फेरबदलामुळे आता जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलीस ठाण्यांचा कारभार नव्या पोलीस अधिकार्‍यांमार्फत चालणार आहे.

जिल्ह्यातील रेवदंडापासून अलिबाग व अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जूगार, गुटखा, अवैध पेट्रोल विक्री सारखे धंदे राजरोजपणे सुरु आहेत. नव्याने पोलीस ठाण्यात दाखल झालेले पोलीस अधिकारी या अवैध धंद्यावर अंकूश ठेवतील का असा प्रश्‍न जिल्ह्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चौल दत्तमंदिर चोरी प्रकरण उघडकीस येईल का?
मागील वर्षी चौल- भोवाळे येथील दत्त मंदिरात चोरी झाली होती. ही घटना घडून एक वर्ष उलटून गेला आहे. मात्र रेवदंडा पोलीसांकडून अद्यापही चोरट्यांचा शोध लागला नाही. रेवदंडा पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले एक डॅशिंग व शिस्तबध्द अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे चौल दत्तमंदिर चोरी प्रकरणाचा शोध लावण्यात ते यशस्वी होतील का असा प्रश्‍न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
Exit mobile version