संघर्षकडून शिवस्मारकाचा कायापालट

श्रमदान, पदरमोड करून स्वच्छता व सुशोभिकरण
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
येथील शिवाजी महाराज स्मारकाचा ङ्गएक संघर्ष समाजसेवेसाठीफ या ग्रुपमधील सदस्यांनी कायापालट केला आहे. प्रत्यक्ष श्रमदान व पदरमोड करून येथे गेल्या आठवडाभरापासून स्वच्छता व सुशोभिकरण मोहीम राबविली. या मोहिमेत पालीतील नागरिक हिरिरीने सहभागी झाले आणि शिवस्मारकाचा कायापालट केला.

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शिवस्मारकाचा कायापालट करावा, तेथे साफसफाई व दुरुस्ती करावी यासाठी एक संघर्ष समाजसेवेसाठी य ग्रुपवर साद घातली गेली. आणि, जातपात, धर्म विसरुन अगदी लहानग्यांसह मोठे देखिल हातात झाडू, फावडे, कुदळ, कोयता, झाड छाटण्याची कैची आदी साधन सामग्री घेऊन कंबर कसून कामाला लागले. हे सर्व दिवसभर आपला कामधंदा व नोकरी सांभाळून रात्री स्मारकात श्रमदानासाठी जमत होते. संपूर्ण स्मारक आणि आजूबाजूचा परिसर चकाचक करण्यात आला आहे.

सारे काही समाजसेवेसाठी
एक संघर्ष समाजसेवेसाठी या ग्रुपमध्ये पालीतील होतकरु व सामाजिक जाण असलेले सुज्ञ तरूण व नागरिक सहभागी झाले. अशा प्रकारे सोशल मीडियाचा प्रभावी व विधायक वापर करुन शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना सर्वच स्तरातून पाठिंबा व सहकार्य मिळत आहे.

स्मारकासाठी पदरमोड
सर्वांनीच आपापल्या परीने पैसे स्वरुपात मदत केलीच. तर, काहींनी स्मारकाच्या कंपाऊंडसाठी जाळी, लाद्या व लोखंडी पाईप दिल्या. काहींनी वाळू, सिमेंट, माती व झाडे दिली, कौल दिले, रंग पुरविला, बाकडे दिले. या बरोबर काहींनी कुठलीही मजुरी न घेता रंगकामासाठी, वेल्डिंगसाठी पुढाकार घेतला आहे. सुशोभीकरण केले आहे.

Exit mobile version