श्रमदानातून गावासाठी रस्ता
| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील चेरफळवाडी व लोलगेवाडी ही दुर्गम गावे आहेत. येथे जाण्यासाठी पक्का रस्ता तर नाहीच मात्र असलेल्या कच्या रस्त्याची सुद्धा दुरवस्था झाली आहे. अखेर येथील ग्रामस्थ एकत्र आले व हातात कुदळ पावडे घेऊन चेरफळवाडी व लोलगेवाडी ते उद्धर या रस्त्याची श्रमदान व पदरमोड करून नुकतीच दुरुस्ती केली. यावेळी तरुणांसह महिला व वृद्धांचा समावेश उल्लेखनीय होता. शासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर विसंबून न राहता रस्ता दुरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च गावकी मधून करण्यात आला. येथील शेतकर्यांना भात पीक व इतर शेती उत्पादने शहरात विकायला घेऊन जाण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागते. मात्र खराब मार्गामुळे येथून नुसते चालणे सुद्धा अवघड होते.
त्यामुळे गावकर्यांनी एकत्र येऊन श्रमदान करून रस्त्याची दुरुस्ती केली. यावेळी स्वतः गावकर्यांनी ट्रॅक्टरने माती आणली. सर्वांनी मिळून ही माती रस्त्यावर टाकून रस्ता समतल केला. दगडगोटे बाजूला केले. आणि हा कच्चा रस्ता सुस्थितीत केला. सरकार आणि प्रशासनाने या कडे लक्ष घालून पक्का डांबरी रस्ता बनून देऊन ग्रामस्थांचे कष्ट कमी करावेत अशी मागणी देखील येथील ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी सरपंच मुक्ता लहू बांगारे, गावकी अध्यक्ष दामा निरगुडे, खजिनदार नारायण हंबीर, संजय निरगुडे, सुरेश निरगुडे, काशिनाथ बांगारे, केशव हंबीर, राम वाक आदि गावकी सदस्यांसह गावकरी उपस्थित होते.