समाजाचे परिवर्तन महिलांच्या हाती – आ.जयंत पाटील यांचे गौरवोद्गार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या जिद्दीच्या जोरावर ज्या महिलांनी समाजात चांगले काम केले आहे, त्या कर्तृत्ववान महिलांचा ‘सावित्रीरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शेकाप महिला आघाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. या महिलांचा आदर्श अन्य महिलांनीदेखील घेणे आवश्यक आहे. कारण, समाजाचे परिवर्तन महिलाच करू शकतात, असे गौरवोद्गार शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी काढले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या पुढाकाराने शेतकरी कामगार पक्ष, अलिबाग तालुका महिला आघाडीच्या पुढाकाराने वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सावित्रीरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.



अलिबागमधील चेंढरे येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात गुरुवारी (दि. 14) मार्च रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, प्रियदर्शनी पाटील, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, नगरपरिषदेच्या माजी नगसेवक वृषाली ठोसर, संजना कीर, सुरक्षा शहा, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, बेलोशी हायस्कूलचे चेअरमन प्रकाश खडपे, शेकाप महिला आघाडी तालुका प्रमुख प्रीती पाटील, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, रोशनी मोकल, नागेश्‍वरी हेमाडे, अश्‍विनी ठोसर, अंजली ठाकूर, अनिता पवार, संगीता म्हात्रे, सुकन्या साखरकर आदी मान्यवर, महिला पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.



याप्रसंगी आ. जयंत पाटील यांनी म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रात बदल होत असताना दिसून येत आहे. महिलादेखील वेगळ्या पद्धतीने भरारी घेत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सावित्रीरत्न पुरस्काराचा कार्यक्रम एक वेगळ्या स्वरुपाचा आहे. यातून अनेक महिला प्रेरणा घेऊन काम करतील, असा विश्‍वास आहे. रोजगारनिर्मितीसाठी महिलांना भरपूर संधी आहेत. त्याचा पुरेपूर महिलांनी फायदा करून घ्यावा. पर्यटनातून वेगवेगळे व्यवसाय उभे करून स्वतःला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या क्षेत्रासाठी काम केले आहे. वेगवेगळ्या संस्था-संघटना उभ्या आहेत. त्यातून अनेकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यातील महिलांनीदेखील वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत. कारण, अशिक्षित महिलादेखील विचार घेऊन समाजात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. महिला आघाडीने महिलांसाठी राबवलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम जिल्हा परिषद गट स्तरावर घेणे गरजेचे आहे. कारण, समाजात गावे, वाड्यांमध्ये कर्तृत्वान महिला आजही चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे चित्र आहे. समाजात बदल घडविण्याची शक्ती फक्त महिलांमध्ये आहे, असे आ. जयंत पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपण बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो. हे संविधान अबाधित राहिले पाहिजे, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती घरत, प्रास्ताविक चित्रलेखा पाटील यांनी केले. तर, आभार अनित पवार यांनी व्यक्त केले.

Exit mobile version