हल्ल्यात बकरीचा बळी
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरातील गायगोठण परिसरात बिबट्याचा संचार सुरू झाला असून परिसरातील वाड्यात बांधलेल्या बकरी वर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बकरी मृत पावल्याने गायगोठण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोविंद शिगवण (जीवनेश्वर पाखाडी, श्रीवर्धन) यांचा गायगोठण परिसरात पाळीव गुरं ढोर बांधण्याचा वाडा आहे.बुधवारी 4 मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे गुरांच्या राखणी करीता गेले असता मध्यरात्री एकच्या सुमारास बांधलेल्या बकरीचा जोरजोरात आवाज येताच पलिकडच्या खोलीत झोपलेले हे शिगवण हे बकरी का ओरडत आहे हे बघण्यासाठी गेले असता बिबट्याने बकरीचा गळा पकडल्याचे निदर्शनास आले.त्यांनी भितीने आरडाओरडा करताच व आजुबाजुच्या कुत्र्यांनी भुकण्यास सुरुवात करताच बिबट्यानी खिडकी मधुन पळ काढला.रक्ताच्या थारोळ्यात मृत झालेली बकरी बघताच शिगवण यांनी जीवनेश्वर पाखाडी येथील काशिनाथ गुरव व तेथील रहिवाशांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतरगुरव तेथील रहिवासी मध्यरात्री दीडच्या सुमारास गायगोठण परिसरात बिबट्याच्या शोधात गेले.परंतु बिबट्या तेथून जंगलात पसार झाला होता. मृत झालेली बकरी ही अंदाजे अडीच ते तीन वर्षाची असून, शिगवण यांचा उदरनिर्वाह गाय,बकरी ह्याच व्यवसायावर आहे.बकरी मृत झाल्याने त्यांचे नऊ हजाराचे नुकसान झालेले असुन सरकारी नियमानुसार आपणास नुकसान भरपाई मिळावी अशी गोविंद शिगवण यांनी मागणी केली आहे.
गायगोठण परिसर हा शहरापासून काहीच अंतरावर आहे.भुकेने व्याकुळ झालेला बिबट्या अन्नाच्या शोधात शहरापर्यंत सुध्दा येऊ शकतो. वनविभाग खात्याने लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा. – काशिनाथ गुरव.जीवनेश्वर पाखाडी.श्रीवर्धन.