कर्जत तालुक्यातून लाल मातीची वाहतूक

पकडलेल्या गाड्या सोडल्याने चौकशीची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील लाल मातीवर नवी मुंबई व मुंबईमधील बगीचे आणि मैदाने हिरवेगार होत आहेत. मात्र, त्या लाल मातीची विनापरवाना वाहतूक कर्जत तालुक्यातून केली जात असल्याचे उघड झाले आहे. महसूल विभागाने मंगळवारी (दि.20) रात्रीच्या सुमारास कारवाई करताना दोन हायवा गाड्या पकडल्या. मात्र, त्या गाड्या रात्रीच्या अंधारात सोडण्यात आल्याने महसूल खात्याने केलेल्या कारवाईबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. मुरबाड तालुक्यात माती उत्खनन सुरू असल्याने महसूल विभाग कशाप्रकारे कारवाईचा बडगा उगारला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील जमिनीमध्ये असलेल्या लाल मातीचे कुतूहल शहरवासियांना आहे. लाल माती ही रोपवाटिका आणि गार्डन तसेच मैदानासाठी महत्त्वाची समजली जाते. त्याच लाल मातीवर डोळा ठेवून माती उत्खनन आणि मातीची चोरटी वाहतूक सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून हा गोरख धंदा सुरू असून, मागील वर्षी एप्रिल महिन्यात कर्जत तहसीलदार यांच्याकडून कारवाई सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात मातीची तस्करी थांबली होती. परंतु, पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा लाल मातीचे उत्खनन सुरू झाले असून, लाल मातीची वाहतूक कर्जत तालुक्यातील रस्त्यावरून सुरू आहे. गेल्या महिनाभर ही वाहतूक रात्री 8 वाजल्यापासून पहाटेपर्यंत सुरू असताना रस्त्यांची दुरवस्था होत असल्याच्या तक्रारी आदिवासी भागातील ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे अशी अवैध वाहतूक थांबवण्यात यावी, अशी मागणी साळोख ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ करीत होते.

याबद्दल महसूल विभागाला माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांच्या सूचनेने महसूल विभागातर्फे मंगळवारी रात्री लाल मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्यांवर कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या पथकाने मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करणाऱ्या लाल मातीने भरलेले एक हायवा वाहन कडाव येथे ताब्यात घेतले.ते वाहन कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यास सांगून नायब तहसीलदार आणि 3 गाव महसूल अधिकारी व तलाठी यांचे पथक कर्जत-मुरबाड रस्त्याने कळंबकडे जात असताना आणखी एक हायवा गाडी महसूल खात्याला चकवा देऊन पुढे गेली. त्यानंतर महसूल खात्याच्या मदतीला काही आदिवासी तरुण आले आणि त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या हद्दीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणखी एक लाल मातीने भरलेली हायवा गाडी अडवून ठेवली. त्या गाडीचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री 1 वाजता केला आणि ती गाडी नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट येथे आणून उभी करण्यात आली.

महसूल खात्याचे पथक साळोख ग्रामपंचायत हद्दीत लाल मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात होती. त्यावेळी मुरबाड तालुक्याचे हद्दीत तब्बल आठ हायवा गाड्या आणि एक पोकलेन मशीन तेथे माती काढण्याचे काम करीत सुरू होते. त्या ठिकाणी कर्जत महसूल विभागाचे पथक ठाणे जिल्ह्याची हद्द असल्याचे कारण देऊन त्या उत्खननाकडे महसूल खात्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्जत महसूल खात्याच्या या कारवाई करताना मुरबाड तालुका तहसील कार्यालयाशी संपर्क करून करावी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version