मुंबई- गोवा महामार्गावर ट्रॅव्हलर मिनी बसला अपघात

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठण्याजवळील पाटणसई गावाच्या हद्दीत असलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर, मुंबई कडून पोलादपूरला जाणारी शिवमिरा ट्रॅव्हल्सची मिनी बस दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. या अपघातात बसचा चालक अभिषेक घाटे याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कुणीही प्रवासीही जखमी झाले नाही. हा अपघात मंगळवारी (दि.9) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, नागोठण्याजवळील पाटणसई गावाच्या हद्दीत असलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर, मुंबई कडून पोलादपूरला जाणारी शिवमिरा ट्रॅव्हल्सची मिनी बस दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. बस चालक अभिषेक घाटे हे गाडी चालवत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटून सदर गाडी पाटणसई गावा जवळील पुलाचे दुभाजकावर चढली. सदर अपघाताची घटना घडली त्यावेळी नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी हे रात्रीची गस्त करीत होते. सचिन कुलकर्णी यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर गाडीचे चालक अभिषेक घाटे यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात नेले. तसेच क्रेनच्या सहाय्याने सदर ट्रॅव्हलर बस तात्काळ बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे सपोनि सचिन कुलकर्णी करीत आहेत.

Exit mobile version