भटवाडीजवळ गतिरोधक नसल्याने अपघातांना आमंत्रण
| रसायनी | प्रतिनिधी |
दांड -रसायनी या मार्गावर भटवाडी रिस रस्त्यालगत तळाटी सजा कार्यालय ,प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा ,आरोग्य केंद्र बॅका, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने असून शाळेत जाताना शाळकरी मुले पायी चालत जाणे पसंद करीत असतात. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्यांविषयी भीती निर्माण होत असून, मुलगा शाळेत पोहचेपर्यंत ते घरी येईपर्यंत पालक भीतीच्या छायेखाली असल्याचे मत पालक वर्ग करीत आहे.
या मार्गावरून पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनांची रहदारी सुरुच असते. यावेळी दांडमार्गे रिस मोहोपाडा दिशेने येणारी वाहने सुसाट चालवली जात असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. भटवाडीजवळ उतार असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची आवश्यकता आहे. येथे गतिरोधक नसल्याने वाहने वेगात चालवली जात असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिसरातील मुले शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्यावरुन पायी जात असतात. परिणामी या रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्यामुळे अपघाताची समस्या गंभीर होत आहे.
दरम्यान, भटवाडीजवळ गतीरोधक त्याचबरोबर वाहनांची गती कमी करण्याचे फलक लावण्याची मागणी पालकवर्गासह प्रवासी करत आहेत. या मार्गावर अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, आपला पाल्य शाळेत पोहचेपर्यंत तसेच घरी येईपर्यंत पालक चिंतेने ग्रासले जात असल्याचे पालक वर्गांचे म्हणणे आहे. तरी भटवाडी थांब्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक न लावल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.







