। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण पेण असून, भविष्यात तिसरी मुंबई म्हणून पेणकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक बिल्डर (विकासक) भविष्याचा वेध घेऊन पेणकडे आपला मोर्चा फिरवलेला दिसत आहेत. त्यामुळे हे विकासक अनेक शासन नियमांची पायमल्ली करून पेण शहराच्या आजूबाजूच्या गावामध्ये आपले बस्तान बसवित आहेत. मात्र, आपले व्यावसायिक पाय पसरवित असताना हे विकासक निसर्गालादेखील हानी पोहोचवत आहेत. पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्या अंबेघर या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये युनायटेट ग्रुपचा मृदगंधार हा गृह निर्माण प्रकल्प सुरू आहे. यामध्ये येणार्या जागेमधील या विकासकांनी वनविभागाची परवानगी न घेता झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये साग, ऐईन, जांभुळ, वावला, आंबा आदींसह इतर झाडांचादेखील समावेश आहे. शासनाच्या नियमानुसार खासगी जागेतील झाडे तोडायची असतील, तरीदेखील वनखात्याची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. परंतु, झाडे तोडण्यासाठी या विकासकांनी वनखात्याकडून परवानगी घेतली नाही. या प्रकाराबाबत वनखात्याकडून माहिती घेतली असता असे समजले की, वनखात्याकडे परवानगीसाठी युनायटेट ग्रुपच्या एका सदस्याने अर्ज केला होता. परंतु, वन खात्याकडून परवानगी मिळण्याअगोदरच या मंडळीने झाडे तोडली होती.
दंडात्मक कारवाईची शक्यता
परवानगी नसताना झाडे तोडणे हा गुन्हा आहे. त्यामुळे या विकासकांवर 50 रूपयांपासून 1000 रुपयांपर्यंत प्रत्येक झाडामागे दंड आकारला जाईल. तसेच एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे लाावण्याचा आदेशदेखील होऊ शकतो. त्यामुळे बेकायदेशीररित्या झाडे तोडणार्यांवर वन खात्याचे लक्ष बारीक असून, भविष्यात विनापरवानगी झाडे तोडणार्यांवर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल.
- जरी स्वतःच्या खासगी जागेतून झाडे तोडायची असली, तरी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, युनायटेट ग्रुपकडून परवानगी घेण्याअगोदरच झाडे तोडली. त्या झाडांचा आम्ही पंचनामा केला असून, त्याचे तपशील वरिष्ठांकडे पाठविले आहे. सदर मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार वरिष्ठांकडे आहे. – के.जे. चौधरी, वनविभाग परिमंडळ, पेण