राजकीय पुढार्यांचे बगलबच्चे मालामाल; योजना पुर्ण न होताच पुर्ण बिल ठेकेदाराला अदा
। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील सर्वात मोठी खारबंदिस्तीची योजना म्हणजे नारवेल-बेनवले खारबंदिस्ती योजना. या योजनेचे कार्यारंभ आदेश 30 जुलै 2020 रोजी देण्यात आले. ही योजना मे 2022 पर्यंत पुर्ण करणे बंधनकारक होते. मात्र आजमितीस हे काम पूर्ण झालेले नाही. या योजनेत अधिकार्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासल्यामुळे ठेकेदारांनी मात्र धमाल केली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या योजनेचा ठेका सोलापूर येथील ठेकेदार प्रथमेश काकडे यांना देण्यात आला होता. सुरूवातीला या योजनेची किंमत 51 कोटी 76 लाख 22 हजार 410 रूपये होती. साधारणतः 2020 मध्ये या योजनेला सुरूवात झाली. सुरूवातीच्या काळापासूनच या योजनेत अनेक राजकीय मंडळीनींनी हस्तक्षेप करून आपल्या बगलबच्च्यांना कशी कामं मिळतील, यासाठी प्रयत्न केला. काही प्रमाणात शेतकर्यांना दमदाटी करण्यासाठी खाकी आणि खादी एकत्र आल्याचे पहायला मिळाले. तसेच या योजनेत काही गावगुंडांनी आपल्या पोळीवर तुप वाढले. पेणचे आमदार आणि अलिबागच्या आमदारात या योजनेवरून संघर्षही पेटल्याचे जिल्ह्याने पाहिले.
आज जवळपास साडेचार वर्ष उलटून गेली आहेत. या योजनेबाबत कृषीवलच्या प्रतिनिधींनी खारभुमीच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतल्यानंतर जी माहिती समोर आली, ती फारच धक्कादायक आहे. 16.40 किलोमीटरच्या योजनेमधील 180 मीटर आणि 150 मीटर अशा दोन ठिकाणी खारबंदिस्तीचे काम झालेच नाही. असे असतानाच अधिकार्यांनी ठेकेदाराला पुर्ण बिल अदा केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकर्यांना जर आपल्या जमिनीचा मोबदला दिला असेल तर ते जमिन खाली का करत नव्हते अथवा जमिन खाली का करून घेतली नाही याविषयी अभियंता भोईर यांनी बोलणे टाळले.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व शेतकर्यांना जमिनीचा मोबदला मिळाला आहे. मग 180 मीटर आणि 150 मीटरचे अशा दोन तुकडयांची बंदिस्ती न होता योजना पुर्ण झालीच कशी? 16.40 किलोमिटरच्या खारबंदिस्तीमधील दोन तुकड्यांची काम न झाल्याने ही योजना अपुर्या स्थितीतच आहे. तसेच ही योजना अयशस्वी आहे कारण जर या दोन ठिकाणांतून बंदिस्तीला खांड गेल्यास जवळपास 1 हजार 388 हेक्टर जमिन नापिक होईल. म्हणजेच शासनाचा जवळपास 93 कोटी खर्च पाण्यात जाईल.
याशिवाय या बंदिस्तीच्या बाजुने वृक्षलागवण होणार होती. परंतु एकही झाड ठेकेदाराकडून लावण्यात आले नाही. कृषीवलच्या प्रतिनिधीने 16 किलोमिटरच्या खारबंदिस्तीची पाहणी केली. त्यांना कुठेही झाडे आढळली नाहीत. तसेच पुढे दिड वर्षासाठी दाइत्व कालावधी असून ठेकेदारांनी या बंदिस्तीची देखभाल दुरूस्ती करणे बंधनकारक आहे. परंतु 180 मीटर आणि 150 मीटर या दोन तुकड्यांची बंदिस्ती न झाल्याने ही पुर्ण योजना अपयशी ठरत आहे. कारण काळेश्री येथील 0 ते 180 मिटरच्या दरम्यात संरक्षण भिंत पाण्यामध्ये सरकली आहे. ती या बंदिस्तीचाच भाग आहे. याचाच अर्थ अधिकार्यांनी बिल काढून कमाल केली ठेकेदारांनी बिल घेउन धमाल केली तर राजकीय बगलबच्चे लक्ष्मीदर्शनाने मालामाल झाले.
काम अपूर्ण, बिल पूर्ण?
काळेश्री गावालगत असणार्या नारवेल-बेनवले या खारबंदिस्ती योजनेतील 0 ते 180 मीटरचा बांध पुर्ण झाला नाही. याबाबत उपअभियंता अतुल नंदन भोईर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, योजना मार्च 2024 ला पुर्ण झाली असून ठेकेदाराला योजनेचे पुर्ण बिल 92 कोटी 80 लाख दिले आहेत. मात्र कृषीवलच्या प्रतिनिधीने काळेश्री येथील 0 ते 180 मिटरची खारबंदिस्ती तसेच दिव ग्रामपंचायत हद्दितील अशोक ठाकूर यांच्या घराशेजारी साधारण 140 ते 150 मीटरचा बांध झाला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर शेतकरी जमिन देत नाहीत म्हणून दोन ठिकाणी खारबंदिस्तीचे काम अपुर्ण राहिले. ते वगळून बिल काढले असल्याचे भोईर यांनी सांगितले.