नाताळ निमित्त रोषणासह सजावटीची तयारी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अध्यात्म,भक्ती, श्रध्देसोबतच आनंद व जल्लोष घेऊन येणारा ख्रिस्त समाजातील नाताळ हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. प्रभू येशुंचा जन्म दिवस म्हणून या दिवशी जल्लोष साजरा केला जातो. नाताळ निमित्त बाजारात सांताक्लॉजचे लहान मोठे बाहुले,टोप्या, क्रिसमस ट्री अशा अनेक वस्तूंनी जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. बुधवारी (दि.25) नाताळच्या पार्श्वभूमीवर चर्च, घरे, वाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात आली आहे. त्याची लगबग ठिकठिकाणी दिसून आली आहे.
डिसेंबर महिना उजाडल्यानंतर अनेकांना नाताळसह सरत्या वर्षाला निरोप देण्याची चाहूल लागते. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागसह अनेक तालुक्यांमध्ये विशेष म्हणजे मूरूड तालुक्यात ख्रिस्ती समाज आहे. सध्या जिल्ह्यामध्ये नाताळ सणाची तयारी जोरात सुर आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. सजावटीच्या साहित्यांना बाजारपेठा सजल्या आहेत. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग आहे. ख्रिस्त जन्माच्या देखाव्यासाठी गोठे, दिव्यांच्या माळा, सांताक्लॉजचे चित्र, बाहुले, टोप्या,प्रभू येशू आणि मेरीच्या मुर्तींना ग्राहकांकडून प्रचंड मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सेंटमेरीसह अनेक शाळांमध्ये सांताक्लॉ आणि सांताक्लॉजचे मुखवटे, क्रिसमस ट्री खरेदी करून सजावट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांकडून यामध्ये सक्रीय सहभाग दिसून आला आहे. सांताक्लॉजचे पेहराव करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या चर्चमधील प्रार्थना सभागृहात सजावट करण्यात आली आहे. विद्यूत रोषणाईसह वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे फुले लावण्यात आले आहेत. बुधवारी होणार्या नाताळच्या दिवशी सकाळी प्रार्थना घेतली जाणार आहे. अनेकांना गोड पदार्थ देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तसेच सायंकाळी वेगवेगळे सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची महिती देण्यात आली आहे.
डैशिंग थ्रू द स्नो…इन अ वन हॉर्स ओपन स्लै…ओवर द फील्ड्स वी गो…लाफिंग आल द वे…बेल्स ओन बोब टेल्स रिंग…मेकिंग स्पिरिट्स ब्राइट…व्हाट फन ईट इज़ टू राइड एंड एंड सिंग…अ स्लेईग सोंग टू नाइट…हो…जिंगल बेल्स जिंगल बेल्स…जिंगल आल द वे… ख्रिसमस म्हटलं की आपल्या कानात वाजू लागते, जिंगल बेल अन् समोर दिसतो लाल कपड्यातला सांताक्लॉज.. त्याच्या अंगावर लाल रंगाचे कपडे, पांढरी शुभ्र दाढी आणि गोंड्यांची टोपी असते. नाताळची उत्कंठा असते ती लहान मुलांमध्ये सांता बाबा येईल आणि काहीतरी गिफ्ट देऊन जाईल. यामुळे नाताळबाबाची वाट पाहत झोपणार्या चिमुकल्यांबरोबरच हा सण ख्रिश्चन बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.