रावढळमध्ये 72 वृक्षांची लागवड
। महाड । प्रतिनिधी ।
एकीकडे वाढत्या तापमानवाढीमुळे आणि मानवी चुकांमुळे जंगलांना वणवे लागून नैसर्गिक साधनसंपत्ती होरपळून निघत असल्याच्या चिंताजनक घटना घडत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत, केवळ कोरडी चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे. ‘रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्था, रावढळ (रजि.)’ यांच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गाव परिसर आणि रानात प्रत्यक्ष वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला. रविवारचा सुट्टीचा दिवस साधून संस्थेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत श्रमदानातून परिसरातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवली.
या मोहिमेत ‘रेशीम बंधू परिवारा’चे कार्याध्यक्ष राजू रेशीम, अध्यक्ष शिवाजी रेशीम, उपाध्यक्ष भरत रेशीम, सेक्रेटरी ऋषिकेश रेशीम, उपसेक्रेटरी परेश रेशीम, उपखजिनदार महेश रेशीम, तसेच शिक्षक अनंत रेशीम, शिक्षिका मयुरी रेशीम, सल्लागार ज्ञानदेव रेशीम, सुरेश रेशीम, तेजस रेशीम, संजय रेशीम, भागुराम रेशीम, अमोल रेशीम, प्रणय रेशीम, रोशन रेशीम आणि अनिकेत रेशीम आदी पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरण संवर्धनासोबतच भविष्यात स्थानिक पातळीवर निसर्गाचा समतोल राहावा, या उद्देशाने या सर्व पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी मिळून वैविध्यपूर्ण झाडांची निवड केली होती. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, साग तसेच चिकू, पेरू आणि कोकम अशा उपयुक्त वृक्षांचा समावेश होता.
ही झाडे परिसरातील डोंगर भागात, शेतीच्या बांधांवर आणि घरासमोरील व पाठीमागील परसबागेमध्ये योग्य नियोजन करून लावण्यात आली. ‘एक झाड, एक जीवन, एक भविष्य!’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकूण 72 वृक्षांची लागवड यशस्वीरीत्या पूर्ण केली.
केवळ झाडे लावून न थांबता, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची आणि संरक्षणाची थेट जबाबदारी संस्थेच्या सदस्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. नियमित पाणी देणे, कुंपण घालणे आणि उन्हाळ्याच्या दिवसांत वणव्यांपासून या झाडांचे रक्षण करणे यासाठी सर्व पर्यावरणप्रेमी सदस्य कटिबद्ध आहेत.
‘झाडे लावा, जीवन वाचवा, पर्यावरण सुंदर करा आणि भविष्य उज्ज्वल करा’ असा संदेश देत संस्थेने सर्वांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. वृक्षारोपणामुळे शुद्ध हवा मिळते, जमीन पाणी साठवून ठेवते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो, ज्यामुळे आपले भविष्य सुरक्षित होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. निसर्गाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी ‘रेशीम बंधू परिवार, रावढळ’ यांनी वणव्यांच्या पार्श्वभूमीवर डोंगर, शेती आणि परसबागेत उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून, संपूर्ण महाड परिसरातून या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले जात आहे.
झाडे फक्त लावायची नाहीत, तर ती वणव्यांपासून वाचवून जगवायची आहेत, या उद्देशाने रविवारच्या सुट्टी दिवशी एकत्र येत श्रमदान केले. या लावलेल्या 72 झाडांचे संगोपन करून परिसर हिरवागार करणे हेच आमच्या संस्थेचे ध्येय आहे.
– शिवाजी रेशीम,अध्यक्ष,
रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्था
