| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता व देखभाल करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव व माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यांनी संस्थेमार्फत ग्रास कटर व जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. या यंत्रांच्या सहाय्याने संपूर्ण कार्यालय परिसरातील वाढलेले गवत व अनावश्यक झाडा झुडपांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व सुस्थितीत करण्यात आला. त्यानंतर हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या 85 बांबूच्या रोपांची वृक्षलागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या सर्व बांबूच्या रोपांची नोंद अमृत वृक्ष ॲपवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. हा वृक्षारोपण कार्यक्रम पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठानच्या समन्वयक ममता म्हात्रे, नेहा गायकवाड, अफसाना, चंदू चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच शासकीय कार्यालय परिसर हरित व स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. स्वच्छ परिसर, हिरवा परिसर आणि निरोगी पर्यावरणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. अजय कांबळे, रायगड कार्यालयातील डॉ. रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त मुख्यालय, इतर कर्मचारी, तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पशुवैद्यकीय चिकित्सालय परिसरात वृक्षारोपण
