। माणगाव । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष मित्र संघटनेच्या वतीने रविवार, दि. 4 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. रायगड जिल्ह्यात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्ता, महामार्गावरील अनेक लहान-मोठी झाडे वादळ, वणव्यामुळे उन्मळून गेली आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या आजूबाजूचा परिसर रुक्ष वाटत आहे. ही बाब लक्षात घेऊन वृक्ष मित्र संघटना व माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीतून 182 झाडांचे रोपण करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये रातवड ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुनंदा गायकवाड, सतीश पवार, ग्रामसेवक खैरे धरणाचीवाडी गावातील तुषार रसाळ, धनंजय राणे, साहिल राणे, निळज गावातील राकेश दळवी, नितेश कानडे, जयवंत हिलम, विठ्ठल नगर गावातील अनिकेत यादव, निखिल यादव व सर्व गावातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत धरणाचीवाडी व निळज येथील रस्त्यावर 120 झाडे, रातवड येथे 50 झाडे, विठ्ठल नगर येथे 12 झाडे लावण्यात आली.