आदिवासी बांधवांची तहसील कार्यालयावर धडक

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील ठाकूर आदिवासी समाज बांधवांनी चिखलगाव ते घोडगाव या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेसह वाड्यांमधील अनेक समस्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.24) पाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी निवासी नायब तहसीलदार भारत फुलपागारे यांना आपल्या समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आदिवासी बांधवांनी नायब तहसीलदार यांना सांगितले की, आमच्या समस्यांचे संबंधित विभागाकडून तात्काळ निवारण करावे, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी बांधव आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार. याला सर्वस्वी उदासीन प्रशासन आणि राजकीय पुढारी जबाबदार असतील. यावेळी सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेचे अध्यक्ष गोविंद लेंडी, उपाध्यक्ष चंद्रकांत वरगुडे, ताया सिंगवा, मारुती डोके, महादू दोरे, धर्मा सिंगवा, चाऊ सिंगवा, परशुराम दोरे, चंद्रकांत सिंगवा, सुभाष सिंगवा, जानू सिंगवा, अनंता सिंगवा व जानू मेंगाळ आदी ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीवर बहिष्कार
गोविंद लेंडी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सुधागड तालुक्यातील आमचे आदिवासी ठाकूर समाज बांधव शासकीय तसेच नागरी सुविधापासून वंचित आहेत. ठाकूर वाड्यांना रस्ते नसल्यामुळे आजारी तसेच गरोदर बायकांना झोळी करून शहराचे ठिकाणी घेऊन जावे लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासन दिली जातात, कामाची पूर्तता होत नाही. त्यामुळे या वाड्यांमधील ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार उदासीन प्रशासन आणि निष्क्रिय राजकीय पुढारी आहेत, असे देखील गोविंद लेंडी म्हणाले.
Exit mobile version