टोरंट वाल्यांनी जंगल जाळलं
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याच्या पाली भागातील साई डोंगरामध्ये टोरंट वीज कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने खासगी कंपनी म्हणून टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला परवानगी दिली आहे. मात्र, या कंपनीने आदिवासी लोकांचा रोजगार हिरवण्याचा प्रयत्न केला आहे. जंगलातून रानमेवा, कंदमुळे गोळा करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या जंगलाला आग लावली आहे, त्यामुळे या आदिवासी लोकांचा रोजगारच हिरावला आहे. दरम्यान, टोरंट कंपनीकडून आदिवासी लोकांवर उपासमारीची वेळ आणली गेली असून आदिवासी ग्रामस्थ कंपनीच्या भूमिकेमुळे संतप्त झाले आहे.
टोरंट कंपनीला वरिष्ठ पातळीवरून जमीन दिली असल्याचे बोलले जात आहे. पालीतर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीमधील आदिवासी वाडीमधील आदिवासी समाजाचे लोकांचा उदरनिर्वाह हा जंगलातील रानमेवा गोळा करून त्याची विक्री आजुबाजूच्या गावात करून होत असतो. दरवर्षी आदिवासी लोक दिवसभर जंगलात पावसाळ्यात रानभाज्या, तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जंगली मेवा गोळा करीत असतात. आदिवासींच्या घरातील एक व्यक्ती या सर्व वस्तू आजुबाजूच्या गावात जाऊन विक्री करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून अनेक आदिवासींची घरे चालतात. मात्र, यावर्षी यासर्व आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने हिरावून घेतले आहे. या कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी सरकारने आपली वन विभागाच्या मालकीची 640 एकर जमीन देऊन टाकली. या जमिनीत असलेली शंभर दोनशे वर्षापूर्वीची जुनी झाडे यांची संख्या कमी व्हावी म्हणून या जंगलात टोरंट कडून आग लावण्यात आली. त्या आगीमध्ये अनेक झाडे जळून कोलमडून पडली आहेत, तर प्रामुख्याने आदिवासी लोकांचा उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जांभळी करवंदे यांच्या झाडांना प्रमुख लक्ष्य करण्यात आले.
साई डोंगरामध्ये पूर्वी कधीही वणवे लागले नव्हते असे आदिवासी लोकांचे म्हणणे आहे. जरी कधी वणवा लागला तर आदिवासी लोक तेथे पोहचून लागलेली आग विझवायचे. त्याचे कारण त्या जंगलात असलेला रानमेवा हाच येथील लोकांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. त्यामुळे कधीही आग न लागणाऱ्या पालीच्या साई डोंगर भागात लागलेली आग ही मानवनिर्मित होती आणि ती टोरंट कंपनी कडून लावण्यात आल्याचा येथील स्थानिक आदिवासींचा आरोप आहे. जंगलात एकच वेळी असंख्य ठिकाणी आगीचे लोळ पाहून सर्वत्र हाहाकार माजला होता. आदिवासी लोकांनी जंगलात जाऊन पाहिले तर मोठ्या झाडांबरोबर मोठ्या प्रमाणात करवंदे यांच्या सर्व जाळ्या आगीत नष्ट झाल्या आहेत.
उपासमारीची वेळ
आंब्याच्या झाडांना आगीचे चटके बसल्याने झाडावर असलेले लहान -लहान कैरी गळून पडल्या आहेत. तर जंगलात उन्हाळ्यात मिळणारी फळे देखील टोरंट कंपनीकडून लावण्यात आलेल्या आगीमध्ये जळून गेल्याने आता या आदिवासी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
