आदिवासी वाड्या महिनाभरापासून अंधारात; महावितरणचे दुर्लक्ष

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या चिंचवाडी आणि वाघ्याची वाडी येथील आदिवासी समाज गेल्या महिनाभरापासून अंधारात आहेत. विजेचा ट्रान्सफॉर्मर बदल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच आहे. येथील महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करत असून, अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि माजी सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी केला आहे.

जून महिन्यात ट्रान्सर्फार्मर बसविला असूनदेखील लाईट सारखी ये-जा करत असून, रात्र अंधारत काढावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. बहुतांश आदिवासी भाग हा जंगलात आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेला आहे. आणि त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची, साप, विंचू दंश तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे गावात लाईट असणे महत्त्वाचे असते. असे असताना महावितरणच्या कर्मचारी आणि आणि अधिकारी यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी तसेच संपर्क करूनही दुर्लक्ष केले जात असून, अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासने अशा मुजोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत.

चिंचवडी येथील विजेची पेटीदेखील उघडी असून, यामुळे दुर्घटना होत आहेत. वाडीतील रामा गिरा यांच्या दोन बकऱ्या शॉक लागून मृत्युमुखी पडल्या आहेत. याचीदेखील कल्पना महावितरण कर्मचारी यांना देऊनही अद्याप लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रामा गिरा यांनी नुकसान भरपाईची मागणी महावितरणकडे केली आहे. तसेच, त्या भागातील रस्त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यावरून चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना शासन याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत.

चिंचवाडी आणि वाघ्याचीवाडीत महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे आम्हाला रात्रभर अंधारात राहावे लागते. अनेकवेळा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे तक्रारी आणि संपर्क केला तरी त्यांनी अद्याप याकडे दुर्लक्ष केले असून, विचारणा केल्यावर उद्धट भाषा वापरतात. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष घालून आम्हाला कायमस्वरूपी विजेची सोय करावी.

हरिश्चंद्र निरगुडा, माजी सरपंच
Exit mobile version