आदिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित

रस्त्याच्या दुवस्थेबद्दल व्यक्त केली नाराजी


| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर जंगल सत्याग्रह लढ्याच्या 93 वर्षांनंतरही आदिवासींच्या वाड्यावस्त्यांवर साधे रस्ते, वीज व पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. आजही चिरनेरसारख्या ऐतिहासिक गावातल्या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना व विद्यार्थ्यांना नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत नाग्या महादू कातकरी यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांनी संबंधित प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांना जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हाध्यक्ष अविनाश म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष उदय टिळक, जिल्हा सचिव रवींद्र पाटील, जिल्हा कोष प्रमुख मोहन मुजुमदार, जनजाती संपर्क प्रमुख एकनाथ वाघे, जनजाती सुरक्षा मंचाचे सुदाम पवार, कार्यकर्त्या सुनंदा वाघमारे, मीराताई पाटील, कार्यकर्ते रमेश फोफेरकर, दीपक गोरे व अन्य कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

केळाचा माळ येथील आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमिक शिक्षणासाठी डोंगराळ भागातील दगड मातीच्या रस्त्यातून मार्गक्रमण करीत रोज सुमारे तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने, या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कष्टमय झाले आहे. तर अक्कादेवी चिरनेर जंगल सत्याग्रह लढ्याच्या युद्धभूमीकडे जाणाऱ्या अक्कादेवीच्या मार्गावरील आदिवासींच्या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून आदिवासी बांधवांबरोबर चिरनेर ग्रामस्थांनी शासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, या रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूभाडे शेतकऱ्यांना मिळाले नसल्यामुळे या रस्त्याचे अजून भिजत घोंगडे आहे. तर चांदायली वाडीमध्ये अजून प्रकाशाची किरणे पोहोचली नाहीत. येथील काही वाड्यांना अजून शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. एकंदरीत, शासनाच्या उदासीनतेमुळे आणि दुर्लक्षित कारभारामुळे आदिवासी बांधवांच्या नशिबी नागरी सुविधांची समस्या निर्माण झाल्याने आदिवासी समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्मृतिदिनासाठी आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी रस्त्याच्या बिकट अवस्थेबद्दल व येथील नागरी सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामसभेत झाला होता विषय
जलजीवन मिशन योजनेतून अक्कादेवी वाडी ,केळाचा माळ वाडी व चांदायली आदिवासी वाडी तसेच चिरनेर गावात जलकुंभ उभारण्यासाठी 1 कोटी 98 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे कामदेखील सुरू झाले असून, हे काम 200 ते 300 मीटरपर्यंत झालेले आहे. मात्र, ठेकेदार विवेक पाटील यांनी हे काम थांबविले असून, त्यांच्याशी हे काम होत नसेल तर मुख्याधिकाऱ्यांनी या कामासाठी दुसरा ठेकेदार नेमावा, अशी मागणी चिरनेर ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे.

Exit mobile version