पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी पेलतात खडतर आव्हाने

माथेरान । प्रतिनिधी ।
माथेरानच्या पायथ्याशी बहुतेक आदिवासी वाड्या असून बाराही महिने या लोकांचे जीवनमान हे केवळ माथेरान याच एकमेव पर्यटनस्थळावर अवलंबून असते. काही वाड्या ह्या खालापूर हद्दीत येत आहेत. परंतु रोजगाराच्या शोधात पूर्वीपासून ही मंडळी माथेरान मध्ये येऊन आपली आणि कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी डोंगर दर्‍यातून अवघड अशा उभ्या डोंगराला आव्हान देत निमुळत्या पायवाटेने जीवघेणा प्रवास करत इथे येत असतात. कुणी मोलमजुरी करण्यासाठी तर कुणी हंगामाप्रमाणे भाजीपाला, मासे विक्रीसाठी घेऊन येतात. तर काहीजण घोड्यांसाठी लागणारे गवत घेऊन येतात. विशेषतः पावसाळ्यात या डोंगर रांगांतून अवघड निमुळत्या पायवाटेने येताना एका बाजूला उंच उंच कडा त्यावरून एखादी दरड कोसळण्याची दाट शक्यता आणि एका बाजूला जवळपास दोन ते अडीच हजार फूट खोल दरी असा हा खडतर प्रवास करणे म्हणजे एकप्रकारे वेळप्रसंगी मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. या आदिवासींमध्ये बहुतांश लोक हे पनवेल तालुक्यातील धोदानी गावातून सनसेट पॉईंट मार्गे येत असतात.जवळपास दोन ते अडीच किलोमीटरचा हा प्रवास अन तेसुद्धा डोक्यावर गवत अथवा भाजीपाला घेऊन डोंगर चढणे म्हणजे जणूकाही कटू जीवनातील कठीण चढउतार जगण्यासाठी एकप्रकारे अग्निदिव्य पार करण्यासारखेच म्हणावे लागेल यात शंकाच नाही.

धोदाणी येथील आदिवासी लोकांना पनवेल बाजारपेठ सुध्दा हाकेच्या अंतरावर आहे. पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान हा मार्ग उपलब्ध झाल्यास या आदिवासींना खूपच सोयीस्कर होणार असून यामुळेच भविष्यात इथला पर्यटन व्यवसाय सुध्दा वृद्धिंगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सनसेट पॉईंटच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत उत्तम प्रकारे पायवाट उपलब्ध आहे हा मार्ग बनविण्यासाठी आदिवासी बांधव सुध्दा इच्छुक असून शासनाने ह्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयाला हात घातल्यास निश्‍चितपणे इथले पर्यटन बहरण्याची चिन्हे स्पष्ट होऊ शकतात.
मागील काळात माथेरान मधील होतकरू तरुणांनी या ठिकाणी श्रमदान करून शासनाचे लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. तर पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान अशाप्रकारेएमएमआरडीएच्या माध्यमातून फिनिक्युलर रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी सुध्दा आपल्या परीने प्रयत्न केले होते आणि त्यास जवळजवळ यश सुध्दा आले होते परंतु मतांच्या राजकारणापायी तालुक्यातील काही मंडळींनी या महत्वाकांक्षी प्रकल्पास विरोध केल्यामुळे हा जवळपास शंभर कोटी रुपयांचा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.तर सातत्याने यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे ह्यांनी सुध्दा शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सुध्दा याबाबत एमएमआरडीए च्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा केली असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. भविष्यात शासनाने माथेरान पर्यटनस्थळासाठी विचार केल्यास फिनिक्युलर रेल्वे सेवा सुरू होऊ शकते.मोटार वाहने सुध्दा येथून येऊ शकतात त्यामुळे आदिवासींच्या रोजगारा सोबतच इथल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

Exit mobile version