नामसाधर्म्यामुळे जिवंतपणीच श्रद्धांजली

। मुंबई । प्रतिनिधी ।
माथेरानच्या घाटात सापडलेल्या वीणा कपूर या महिलेच्या हत्येच्या बातमीवरुन अभिनेत्री वीणा कपूर यांना जिवंतपणी श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे.

मुंबईतील वीणा कपूर या महिलेची हत्या तिच्या मुलाने करुन तिचा मृतदेह माथेरान घाटात फेकला होता. त्याचा शोध लागलाही होता. याबाबतची बातमी सोशल मिडियावरुन प्रसिद्ध होताच अनेकांना अभिनेत्री वीणा कपूरचीच हत्या झाल्याचे जाणवले. त्यावरुन अनेकांनी श्रद्धांजलीही वाहिली. पण त्याचा त्रास जाणवू लागल्याने अभिनेत्री वीणा कपूर यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या मृत्यूच्या अफवेबाबत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकारामुळे एका क्षणासाठी सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. मी अजून जिवंत आहे, मात्र या खोट्या अफवेमुळे मला काम मिळणं बंद झालं आहे. असे वीणा कपूर यांनी सांगितले. तसेच वीणा यांचा मुलगा अभिषेक चढ्ढा यांनी म्हटले की, ङ्गही बातमी पसरताच मला आईला मारल्याचे अनेक फोन आले होते. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि ही बातमी ऐकताच मला धक्का बसल्याने मी आजारी पडलो. माझी आई जिवंत आहे आणि मी तिला मारले नाही. हे मी हात जोडून सांगत होतो, असे त्याने सांगितले.

Exit mobile version