। म्हसळा । प्रतिनिधी ।
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी वाचनालयाचे संचालक तथा खजिनदार सुनील उमरोटकर आणि संचालक प्रा.रायप्पा माशाळे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले तसेच वाचनालयाचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.माशाळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव केला. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
