शहीद सुयोग कांबळे यांना मानवंदना
| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय सैन्य दलातील जवान सुयोग अशोक कांबळे यांना रविवारी सकाळी सैन्य दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी सैन्य दलातील अधिकारी, जवान, पोलीस दलातील अधिकारी, महसूल विभागाच अधिकारी यांच्यासह राजकिय, सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कांबळे यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी सुयोग यांच्या आठवणीने संपुर्ण खारेपाट परिसर गहिवरून गेला.
अलिबाग तालुक्यातील चिंचवली-नारंगी बौध्दवाडीतील रहिवासी असणारे सुयोग अशोक कांबळे हे गेल्या 18 वर्षापासून भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना, कांबळे यांना एका दुर्घटनेमध्ये वीर मरण आले. त्यांना भारतीय सैन्य दलाने शहिद म्हणून घोषित केले. भारतीय सैन्य दलामार्फत मानवंदना व अभिवादन सभा रविवारी (दि.12) चिंचवली (बौध्दवाडी) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय लष्कराचे जवान तसेच हजारोंचा जनसमुदाय जमला होता. दरम्यान शहीद सुयोग कांबळे मित्रमंडळाच्या वतीने कार्लेखिंड ते नारंगीपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. त्यावेळी शहीद जवान अमर रहे, या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण परिसर भारावून गेला. रॅलीच्यावेळी शहीद जवान यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करणारा जनसमुदाय तिरंगा हातात घेऊन रस्त्याच्या दूतर्फा उभा होता.
भारतीय सैन्य दलाच्या वतीने शहिद सुयोग कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सैन्यदलातील अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, पालक, कांबळे यांचे नातेवाईक उपस्थित होते.