पनवेल पत्रकार विकास मंचाने वाहिली स्व. मिनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने सोमवारी (दि.1) पनवेल येथे माजी राज्य मंत्री, शेकाप नेत्या स्व. मिनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष विवेक पाटील, माजी सरचिटणीस मंदार दोंदे यांनी मनोगते व्यक्त करत स्वर्गवासी मिनाक्षी ताईंच्या स्मृतींना उजाळा दिला.

29 मार्च 2024 रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या रणरागिणी, संघर्ष कन्या, अभ्यासू व्यक्तिमत्व असणार्‍या मिनाक्षी ताई पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. माजी राज्य मंत्री मिनाक्षीताई पाटील यांनी 1995, 1999 आणि 2009 मध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत तीन वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या सदस्या म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत आपली छाप सोडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मत्स्य व बंदर विकास विभागाचे राज्य मंत्रीपद भूषविताना त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्या सलग बारा वर्षे अध्यक्ष होत्या. त्यांच्या समवेत जिल्हा कार्यकारिणीवर खजिनदारपदी काम केलेल्या माधव पाटील यांनी रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कर्षाकरता मिनाक्षीताईंनी केलेल्या भरीव योगदानाची उपस्थितांना जाणीव करून दिली. अध्यक्ष विवेक पाटील यांनी त्यांच्या 26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मीनाक्षी ताईंच्या समवेत व्यथित केलेल्या कालखंडातील स्मृतींना उजाळा दिला. तर मंदार दोंदे यांनी कर्नाळा वृत्त समूहात कार्यरत असताना मीनाक्षी ताईंच्यासोबत काम करत असतानाच्या विविध आठवणी सांगत मीनाक्षीताईंच्या स्वभाव वैशिष्ट्यातील अनेक पैलू उलगडून दाखविले.

श्रद्धांजली अर्पण करण्याच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष संजय कदम, माजी सरचिटणीस मंदार दोंदे, राजू गाडे, वैभव लबडे, सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version