। माथेरान । वार्ताहर ।
महाराष्ट्र भूषण थोर समाजसुधारक तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त माथेरान श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिम राबवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरूपणकार आणि थोर समाजसुधारक नानासाहेब धर्माधिकारी यांनी बैठकीच्या माध्यमातून अनेक श्री सदस्य घडविले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून आणि परदेशातून देखील बैठकीच्या माध्यमातून श्री सदस्य घडविले गेले आहेत. मंगळवारी (दि.1) त्यांच्या शंभराव्या जयंती निमित्त माथेरान मधील श्री सदस्यांनी येथील प्राथमिक मराठीशाळा परिसर आणि माथेरान नगरपरिषद कार्यालय परिसर या भागात स्वच्छता मोहीम राबिवली.
यामध्ये मंगळवार दि.1 मार्च रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता माथेरान येथील रेल्वेस्टेशन जवळ सर्व श्री सदस्य जमा झाले. त्यानंतर माथेरान येथील नगरपरिषदेच्या कार्यालयात नाना स्वारींच्या प्रतिमेला माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे आणि माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. तिथूनच स्वच्छता मोहिमेला सुरूवात करण्यात आली. माथेरान नगरपरिषद परिसर पूर्णपणे स्वच्छ करून झाल्यानंतर श्री सदस्य माथेरान प्राथमिक शाळेकडे आले आणि तेथील परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेस माथेरान मधील श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माथेरानमध्ये स्वच्छता मोहिमेतून नानासाहेबांना श्रद्धांजली
