| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यामधील कोप्रोली गावातील शब्दांचा जादूगार शब्दसम्राट अर्थात प्रसिद्ध निवेदक रत्नाकर गाताडी यांना स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतून श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्वर्गीय रत्नाकर गाताडी यांना अकरा वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली आहे. दरम्यान, मागील अकरा वर्षापासून सुयश क्लासेसतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून, त्यांना 1 जानेवारी रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. सुयश क्लासेसचे निवास गावंड हे स्वर्गीय रत्नाकर गाताडी त्यांचे शिष्य आहेत. गुरुला श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने निवास गावंड हे अशा प्रकारचे उपक्रम राबवतात. यावेळीही त्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत राजिप शाळा आवरे, जानकीबाई जनार्दन ठाकूर व रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे या शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. यात उपासना विनोद गावंड (प्रथम), सृष्टी मच्छिंद्र कडू (द्वितीय), श्रेया कुंदन गावंड (तृतीय) हे विद्यार्थी स्पर्धेचे मानकरी ठरले. त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देण्यात आली. इतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आवरे येथील एसएससी फेब्रुवारी 2025 च्या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच शिवमंदिराचे पुजारी धर्मा गावंड यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निवास गावंड यांनी केले. ज्ञानेश्वर गावंड यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. व्यासपीठावर प्रा. प्रशांत म्हात्रे, रणिता ठाकूर, ज्ञानेश्वर गावंड, श्री. यादव, संदीप म्हात्रे, विनोद गावंड, सुनिल ठाकूर, प्रमोद म्हात्रे, प्रेम म्हात्रे, शंकर पाटील, वामन पाटील, राकेश पाटील, शुभम गावंड, निवास गावंड आदीजण उपस्थित होते.