वडाळे सरोवरावर तिरंगा, कँडल मार्च

नीट आंदोलनाला पनवेलकरांचा पाठिंबा; महानगरपालिकेच्या भूमिकेवर संताप

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनकर्त्यांवर दिल्ली पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुधवारी (दि.29) सायंकाळी वडाळे सरोवर येथे तिरंगा कँडल मार्च व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला पनवेल पालिकेकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पालिकेच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला.

पनवेल तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नीट परीक्षा प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मृत्यू पावलेल्या 22 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, शेकाप नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील, अतुल म्हात्रे, महादेव वाघमारे, चंद्रसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवत, या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करून संबंधितांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच, स्व. दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यास होणाऱ्या विलंबाचाही त्यांनी निषेध व्यक्त केला. “देशातील विद्यार्थी जागृत झाला असून, विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असेही ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी आयोजकांनी पनवेल महानगरपालिकेकडे पूर्वपरवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी परवानगी नाकारल्याचे पत्र देण्यात आले. तसेच, उभारण्यात आलेले व्यासपीठ महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून थांबविण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पनवेल शहर पोलीस व गोपनीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात होते. तसेच, वडाळे सरोवर परिसरातील हायमास्ट दिवा शॉर्टसर्किटमुळे बंद असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास तो सुरू करण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे श्रद्धांजली कार्यक्रमाला विरोध होणे योग्य नसल्याची भावना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

Exit mobile version