| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 6वे त्रैवार्षिक अधिवेशन रविवारी (दि.1) कर्वेनगर,-पुणे येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष एस.मल्लेशम यांनी केले. या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा मेधा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना एस.मल्लेशम यांनी सांगितले की, देशातील श्रमिक व कामगार सध्या आव्हानात्मक कालखंडातून जात आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 कामगार संहितां पैकी वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोडचे भारतीय मजदूर संघाने स्वागत केले असून त्यांची त्वरित प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच, केंद्र सरकारने देशभर समान ‘मिनिमम फ्लोअर वेज’ जाहीर करावेत. पेन्शन फंडात वाढ व ई.एस.आय.सी. योजनेची पात्रता मर्यादा 21 हजारावरून 42 हजार रुपये करावी, अशी मागणी करत 25 फेब्रुवारी रोजी देशभर ‘सरकार जागव’ आंदोलन करण्यात आल्याचे देखील सांगितले. खासदार मेधा कुलकर्णी यांनी कंत्राटी कामगारांना कायम करावे, या कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. वीज कंत्राटी कामगार संघ ही संघटनेवर आंदोलनाची वेळ येऊ न देता प्रशासनाने तातडीने बैठका घेऊन संवाद साधत संघटनेच्या सदस्य कामगारांच्या समस्यां त्वरित सोडवल्या पाहिजे, असा आग्रह वीज कंपन्याकडे धरला.







