| चित्तेपिंपळगाव | वृत्तसंस्था |
समोर अचानक कार थांबल्याने मागून येणाऱ्या टँकरने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे एसटी बस मागून टँकरला धडकली. या अपघातात बसचालकासह वाहक व सात ते आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.15) सायंकाळी पाचच्या सुमारास केंब्रिज शाळेजवळील जिजाऊ चौकातील उड्डाणपुलावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार, टँकर व बस एकापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, झाल्टा गावाच्या पुढे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. बसचे ब्रेक अचानक लागल्याने बसमधील प्रवासी बसच्या सीटवरून बसमध्ये अचानक फेकले गेले, तर काही प्रवाशांना जबर मार लागला, तर काहींना किरकोळ मार लागला. तीन वाहने एकमेकांना धडकल्याने या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल जवखेडे, कर्मचारी शेजूळ, अशोक वाघ हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना चिकलठाणा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.