सुदैवाने जीवितहानी नाही
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड आगरदांडा येथील जंगल जेटीवर बुधवारी (दि. 06) सकाळी आठच्या सुमारास फेरीबोटीला दिघीकडे जाण्यासाठी आलेला पिकअप टेम्पो तीव्र उतारामुळे चालकाच्या नियंत्रणात न राहिल्याने फेरी बोटीवर चढण्याआधीच जेटीवरून समुद्रात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगरदांडा जेट्टीवरील बोटीवर रिव्हर्स करून टेम्पो मागे घेत असताना तीव्र उतारामुळे टेम्पोचालकाचा ब्रेकवर कंट्रोल झाला नाही आणि क्षणार्धात टेम्पो थेट समुद्रात कोसळला. घटनेतील टेम्पो मुरूड येथील सलमान जमादार (सलमान चिकन सेंटर) यांचा असून ते श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या गावी निघाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पोचालक समुद्रात पडून त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना मुरूड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
शासनाने श्रीवर्धन तालुका व मुरुड तालुका जोडण्यासाठी आगरदांडा ते दिघी अशी फेरीबोट व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी आगरदांडा येथे बांधण्यात आलेल्या जेटीला तीव्र उतार असल्यामुळे मालवाहतूक करणारे लोडिंग वाहने चालकाच्या नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक व इतर वाहन चालकांकडून होत आहे. या जेटीमुळे दुचाकी, इतर चारचाकी वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. दुचाकी नेणाऱ्या चालकांचीदेखील तारांबळ उडते. त्यामुळे शासनाने ही लाखो रुपये खर्चून बांधलेली जेटी निष्फळ ठरत आहे. दुपारपर्यंत टेम्पो बाहेर काढण्यात आलेला नव्हता.