नागोठण्यात रुची हॉटेल समोर तिहेरी अपघात; एसटी चालक जखमी

। नागोठणे । प्रतिनिधी ।

मुंबई- गोवा महामार्गावर नागोठणे हद्दीत महामार्ग रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे. महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना लेनमधील बदल वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने अपघात घडत आहेत. असाच एक अपघात सोमवारी (दि. 16) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एसटी बस, डंपर व कार मध्ये घडला आहे. या अपघातात एस टी चालक केशव सोनवणे, सध्या रा. ओझरवाडी, जिल्हा रत्नागिरी मूळ रा. जि. लातूर हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तरी अपघातात एसटी बस, डंपर तसेच कार या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

एसटी बस चिपळूण ते बोरिवली अशी जात असताना मुंबई बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या आयवा डंपर चालकाने दारूच्या नशेत एसटी बसला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला. एसटी चालक केशव सोनवणे यांच्या तक्रारीनुसार डंपर चालक पंकजकुमार ब्रीज पाल, सध्या रा. वडखळ, ता. पेण, जि. रायगड (मूळ रा. महमूद नगर, ता. जि. मुजफ्फानगर उत्तर प्रदेश) याच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version