त्रिशाचे बालचित्र स्पर्धेत यश

| चिरनेर | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासन यांच्या कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित राज्यस्तरीय बालचित्र स्पर्धेत चिरनेर येथील पी. डी. खारपाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी त्रिशा म्हात्रे हिने राज्यात नेत्रदीपक यश मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कला विश्वविद्यालय शांतिनिकेतन सांगली येथे (दि.16) फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच खा. विशाल पाटील यांच्या हस्ते त्रिशाला पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे चिरनेर जंगल सत्याग्रह व महागणपतीच्या तीर्थस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या चिरनेर गावाच्या शिरपेचात त्रिशाच्या यशामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्रिशाच्या यशाबद्दल तिच्यावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी आईवडिलांचे आणि शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याच्या भावना त्रिशाने व्यक्त केल्या. पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. पी. खारपाटील, उपाध्यक्ष राजा खारपाटील, प्रशासकीय अधिकारी व्ही. ए. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद पट्टेबहादूर, आनंद चिर्लेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्रिशाचे कौतुक करत अभिनंदन केले. व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version