प्रवासी विद्यार्थ्याकडे तिकीट असतानाही आकारला दंड
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानकात दहावीच्या परीक्षेसाठी जाणार्या विद्यार्थ्याला पेपर लिहिण्यासाठी जाण्याआधीच मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. लोकलमधून उतरून स्थानकातून चालत असलेल्या त्या विद्यार्थ्याकडे तिकीट असूनदेखील दंड आकारण्यात आला. त्याबद्दल कर्जत तालुक्यातून रेल्वे स्थानकातील त्या महिला तिकीट तपासनीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सोमवारी 10 मार्च रोजी दहावीचा पेपर होता आणि त्यामुळे दहावीचे विद्यार्थी सकाळी घाईगडबडीत परीक्षा देण्यासाठी निघाले होते. कर्जत परिसरातील शाळांमधील विद्यार्थी यांचे परीक्षा केंद्र हे कर्जत शहरातील अभिनव शाळा आहे. त्यामुळे सकाळी मुंबई येथून खोपोली येथे जाणार्या प्रगती एक्स्प्रेस ट्रेनने विद्यार्थी येत होता. सुपरफास्ट गाडीमधून तू उतरला आहेस आणि त्या गाडीचे तिकीट दाखव, अशी मागणी कर्जत स्थानकात असलेल्या एका महिला तिकीट तपासनीस यांनी केली. तिकीट मागितले असता पुणे येथील बुकिंग क्लार्कने त्याला सुपरफास्टचे तिकीट न देता सामान्य तिकीट दिले आणि क्लार्कने सांगितले हे तिकीट चालेल, तू जा आणि तो मुलगा पुणे येथून प्रगती एक्स्प्रेसने कर्जत येथे आला. गाडीतून उतरल्यावर कर्जत रेल्वे स्थानकातील एका महिला टीसीने त्याच्याकडे तिकीट मागितले. त्या मुलाने आपल्याकडील तिकीट दाखविले असता महिला टीसीने त्याच्याकडून त्याचे तिकीट हिसकावून घेतले आणि 265 रुपयांची पावती फाडून दंड घेतला. त्यावेळी 265 रुपये आपल्याकडे नाही आणि परीक्षेला जायचे असल्याने त्या मुलाची मानसिक स्थितीदेखील ढासळली.
एका शाळकरी मुलाची काहीही चूक नसताना कर्जत रेल्वे स्थानकातील उर्मट महिला टीसीने माणुसकी दाखवली नाही. त्या मुलाला समजून सांगितले असते तरी चालले असते.पण, कर्जत स्थानकात प्रवाशांसोबत नेहमी उर्मटपणे वागत असतात. मात्र, त्यांच्या वागणुकीमुळे तो मुलगा दहावीचा पेपरदेखील नीटपणे लिहू शकला नाही. याविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.