| पनवेल | वार्ताहर |
पनवेल पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या सतर्कतेमुळे प्रादेशिक परिवहन विभागाला बनावट कागदपत्रे देऊन रिक्षाचालकाचा बिल्ला बनवणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केल्यावर प्रत्यक्षात पत्त्यावर जाऊन तपासणी केल्यावर ही बाब उजेडात आली. याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पण, बनावट कागदपत्रे सादर करणारी मोठी टोळी पनवेल, नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागात सक्रिय असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत.
मागील वर्षी जुलै महिन्यात 21 वर्षीय एका संशयिताने नवी मुंबई पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीचा ऑनलाइन अर्ज केला होता. अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी कळंबोली पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील पोलीस नाईक भाऊसो जानकर यांच्याकडे होती. कागदपत्रांविषयी संशय आल्याने त्यांनी कागदपत्रे बाजूला ठेवली. काही दिवसांनी, म्हणजे ऑगस्ट महिन्यात जानकर यांच्यासमोर आणखी एका युवकाचा चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज आला. या दोन्ही अर्जांसोबत पुराव्यासाठी एकच वीज देयक जोडले होते, शिवाय पत्त्यामध्ये खाडाखोड होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संबंधित पत्त्यावर जाऊन वीज देयक आणि दोन्ही अर्जदारांच्या शाळा सोडल्याचा दाखल्याची पडताळणी केली. शाळा सोडल्याचा दाखला पनवेल शहरातील विठ्ठल खंडप्पा हायस्कूलचा होता. हा दाखला बनावट असल्याचे उजेडात आले.
नेरुळला राहणारे दोघेही संशयित मूळ उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील आहेत. प्रादेशिक परिवहन विभागातील एका दलालामार्फत ही कागदपत्रे बनविल्यानंतर एका मोटार ट्रेनिंग स्कूल मालकाच्या माध्यमातून हा गैरव्यवहार सुरु असल्याचे पोलिसांना समजले. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या दरम्यान पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून 2,364 रिक्षांचे बॅच परवाने देण्यात आले आहेत. हे बॅच बनविण्यासाठी अर्जदाराला स्थानिक वास्तव्याचा दाखला, पोलिसांचा अहवाल, ट्रान्सपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे जमा करावी लागतात. संबंधित कागदपत्रे जमा केल्यानंतर त्या कागदपत्रांची सुद्धा पुन्हा पडताळणी प्रादेशिक परिवहन विभागात केली जाते. ज्या अर्जदारांच्या कागदपत्रात त्रुटी असतात असे बॅच परवाने नाकारले जातात.