| मुंबई | प्रतिनिधी |
प्रार्थनास्थळांवर सरसकट भोंग्यांची परवानगी दिली जाणार नाही. यापुढे प्रार्थनास्थळावरील भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातील नियमांचे पालन होत आहे की नाही, याच्या तपासणीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर सोपविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.11) विधानसभेत दिली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंग्यांबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंग्यांसदर्भात नियमावली असली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे मान्य केले. मात्र, आगामी काळात प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.