महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने दिली माहिती
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
अनधिकृतपणे बांधकाम करणारे अथवा व्यवसाय करण्यासाठी पदपथावर टपर्या उभारणार्या व्यावसायिकांना वीज जोडणी देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र पाठवली जात असल्याची माहिती महावितरण विभागाच्या कळंबोली उपविभागाचे अधिकारी सोमेश्वर घुमे यांनी दिली आहे.
पनवेल पालिका हद्द तसेच कळंबोली वसाहती अंतर्गत येणार्या भागात महावितरण विभागाकडून नागरिकांच्या चालण्यासाठी असलेल्या पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना अधिकृत वीजजोडणी देण्यात आली आहे. केवळ एका बॉण्ड पेपरवर देण्यात आलेल्या या जोडणीमुळे अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे फावले असून, अनधिकृतपणे पदपथ काबीज करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महावितरण विभागाचे कळंबोली उपविभागाचे अधिकारी घुमे यांच्याशी संपर्क साधला असता अनधिकृतपणे वीज जोडणी देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र येत असल्याची माहिती घुमे यांनी दिली असून, ‘मागेल त्याला वीज’ या महावितरणच्या धोरणनुसारच आम्ही वीज जोडणी देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पादचार्यांचा हक्क हिरावला
महावितरण विभागाच्या धोरणामुळे मागेल त्याला वीज दिली जात आहे. केवळ एका बॉण्ड पेपरवर वीज जोडणी दिली जात असल्याने पादचार्यांसाठी उपलब्ध असलेल्या पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणार्यांनादेखील वीज जोडणी दिली जात आहे. त्यामुळे पदपथ अडवून व्यवसाय करणार्यांची संख्या वाढल्याने पादचार्यांचा हक्क हिरावला जात असल्याचे मत हनुमंत जगताप या नागरिकाने व्यक्त केले आहे.