| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी भुयारी मार्गात रविवारी (दि.29) दुपारी आयशर टेम्पोला आग लागून तो भस्मसात झाला. आगीमुळे दोन्ही भुयारी मार्गांत धुराचे लोट पसरल्याने खबरदारी म्हणून भुयारातील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर वाहतूक जुन्या कशेडी घाटातून वळवण्यात आली.
पोलादपूरहून खेडच्या दिशेने जाणाऱ्या एमएच 06 एफएक्स 7359 क्रमांकाच्या टेम्पोला इंजिनमधील शॉर्टसर्किटमुळे दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. चालक लालजीप्रसाद जयस्वाल (55) रा. सांताक्रुझ, मुंबई हे सिमेन्स कंपनीचे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स घेऊन जात होते. भुयारातील दोन्ही मार्ग इंटरकनेक्टिव्हिटीच्या युटर्न भुयारांनी जोडलेले असल्याने धूर दोन्ही बाजूंना पसरला. त्यामुळे वाहतूक एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी जय भारत कन्स्ट्रक्शनने सुधारलेल्या जुन्या कशेडी घाटातून वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. कशेडी बंगला येथून धामणदिवीपर्यंत जुन्या घाटाचा वापर करून वाहने पुन्हा महामार्गावर वळवण्यात आली. भुयारातील धूर निवळल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
कशेडी भुयारी मार्गात ट्रक जळाला
