ट्रकची दुचाकीला धडक; चालक ठार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातून जाणाऱ्या मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने खालापूर येथील दुचाकी चालक कडाव येथे जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि या अपघातात दुचाकी चालक ठार झाला.

खालापूर तालुक्यातील कांढरोली येथील धनंजय नरेश ठाकूर (20) हा आपला मित्र विशाल सीताराम वाघमारे याच्यासोबत कर्जत-मुरबाड रस्त्याने कडावकडे (एमएच-46-सीपी-5704) स्कूटीवरून जात होते. सध्या राहणार कडाव येथील मुन्ना लाल (48) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच-06-एक्यू-3654) घेऊन कर्जत बाजूकडून मुरबाडकडे घेऊन जात होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कर्जत एचपी पेट्रोल पंप येथे ट्रकचालक मुन्ना लाल याने हयगयीने ट्रक चालवून मोटारसायकलला पाठीमागून ठोकर देत अपघात केला. अपघातग्रस्त ट्रकचे पाठीमागील चाक स्कुटीचालकाच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेतील जखमी विशाल वाघमारेला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, ट्रकचालक मुन्ना लाल याला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार वडते करीत आहेत.

Exit mobile version